Politics

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून छत्रपती संभाजीनगरमधील विविध विकासकामांची पाहणी; कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश

by Suman Gupta 

छत्रपती संभाजीनगर, दि. २६ ऑक्टोबर :मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विकासकामांना गती देण्याच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यादरम्यान शहरातील विविध विकासकामांची पाहणी करून कामांच्या सद्यःस्थितीचा आणि प्रगतीचा आढावा घेतला. यामध्ये डॉ. हेडगेवार हॉस्पिटलजवळ उभारण्यात येत असलेली सारथी इमारत, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या फेज-२ अंतर्गत सुरू असलेली बांधकामे, नेहरूनगर येथील मा. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींसाठीची निवासी इमारत, नगरनाका ते पडेगाव सहापदरी रस्ता तसेच वाळूज–पंढरपूर–कॅम्ब्रिज–शेंद्रा एम.आय.डी.सी. या प्रस्तावित उन्नत रस्त्याच्या प्रकल्पाचा समावेश होता.

या पाहणीदरम्यान संबंधित प्रकल्पांची सद्यःस्थिती, बांधकामाचा दर्जा, कामांची गुणवत्ता आणि उर्वरित कामांच्या प्रगतीची माहिती घेतली. सर्व कामे निर्धारित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक सूचना संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना दिल्या.

सारथी इमारतीच्या बांधकामाचा आढावा

डॉ. हेडगेवार हॉस्पिटलजवळ उभारण्यात येत असलेल्या सारथी इमारतीच्या बांधकामाची पाहणी करून मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कामाच्या प्रगतीची माहिती घेतली. या प्रकल्पांतर्गत प्रशासकीय इमारत (P+4), मुलांचे वसतिगृह, मुलींचे वसतिगृह (G+12) आणि अभ्यासिका (G+2) अशा चार इमारती उभारण्यात येत आहेत. मुलांच्या आणि मुलींच्या वसतिगृहांमध्ये प्रत्येकी ५२८ विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. बांधकामाचा दर्जा राखून उर्वरित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सारथी इमारतीचे उर्वरित बांधकाम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या फेज-२ कामांची पाहणी

कांचनवाडी येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या फेज-२ अंतर्गत सुरू असलेल्या प्रशासकीय इमारत, ग्रंथालय आणि लेक्चर हॉल या तीन इमारतींच्या बांधकामाचा आढावा घेतला. ग्रंथालय इमारतीच्या पूर्ण झालेल्या बांधकामाची पाहणी केली. तसेच प्रशासकीय इमारत आणि लेक्चर हॉलमधील फरशी, फॉल्स सिलिंग, भिंतींचे फिनिशिंग, अंतर्गत विद्युत व्यवस्था, अग्निशमन यंत्रणा आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती घेतली. उर्वरित कामांना गती देऊन ती नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी दिले.

नेहरूनगर येथील न्यायमूर्तींच्या निवासी इमारतीची पाहणी

नेहरूनगर येथे मा. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींसाठी बांधण्यात येत असलेल्या G+10 निवासी इमारतीची पाहणी करून बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. इमारतीतील खोल्या, हॉल, फ्लोरिंग, स्वयंपाकघर, स्वच्छतागृहे, विद्युत व्यवस्था, पाणीपुरवठा, लिफ्ट आणि अग्निशमन यंत्रणा यांसह विविध सुविधांची तपासणी केली. बांधकामाचा दर्जा आणि अंतर्गत कामांची गुणवत्ता राखण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या इमारतीचे बांधकाम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करून हस्तांतरित करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

नगरनाका ते पडेगाव सहापदरी रस्त्याची पाहणी; वृक्षलागवड

नगरनाका ते पडेगाव या सहापदरी रस्त्याच्या बांधकामाची पाहणी करून रस्त्याची गुणवत्ता, डांबरीकरण, ड्रेनेज व्यवस्था आणि कामाचा वेग यांचा आढावा घेतला. रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासोबतच निर्धारित वेळेचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षलागवडही केली.

औद्योगिक क्षेत्रातील वाहतुकीसाठी प्रस्तावित उन्नत रस्त्याची पाहणी

वाळूज–पंढरपूर–कॅम्ब्रिज–शेंद्रा एम.आय.डी.सी. या प्रस्तावित उन्नत रस्त्याच्या प्रकल्पाची पाहणी करून सद्यःस्थितीची माहिती घेतली. या प्रकल्पामुळे औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास, वाहतूक कोंडी कमी होण्यास आणि दळणवळणाला गती मिळण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन आवश्यक बाबींचा आढावा घेतला.

या दौऱ्याप्रसंगी मंत्री श्री. अतुल सावे, खासदार श्री. संदीपान भुमरे, आमदार श्री. विलास भुमरे, माजी खासदार श्री. भागवत कराड तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Related posts

Service Tax Department & Government of India hosted a press meet announcing the arrival of GST.

BJP leader Kirit Somaiya demanded a CBI inquiry into the RTO scam

Mohit Kamboj on Good Governance: A New Vision for Maharashtra’s Progress

Leave a Comment

− 8 = 2